खुलताबाद, (प्रतिनिधी) : हजरत ख्वाजा जर जरी जर बक्ष यांच्या ७४० व्या उरुसानिमित्त शहरात भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेऊन वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी २० ते ३० ऑगस्ट या कालावधीत खुलताबादमार्गे जाणाऱ्या जड वाहनांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे.
याबाबतची माहिती पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी दिली. उरुसाच्या पार्श्वभूमीवर उपविभागीय पोलिस अधिकारी अपराजिता अग्निहोत्री यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी सकाळी ११ वाजता फर्च मोहल्ला येथून
पोलिसांचा रूट मार्च काढण्यात आला. या वेळी शहरातील संवेदनशील ठिकाणे, गर्दीची ठिकाणे व वाहतूक व्यवस्थेची पाहणी करण्यात आली.
असा असेल चोख बंदोबस्तः
पोलिस दल: २० अधिकारी, १२५ पोलिस अंमलदार, २५० होमगार्ड, १ बॉम्बशोधक पथक आणि १ आरसीपी (दंगल नियंत्रण) पथक
तैनात. कॅमेऱ्यांची नजरः शहरात ५६ सीसीटीव्ही कॅमेरे तसेच आधुनिक सीसीटीव्ही कॅमेरा व्हॅनद्वारे करडी नजर ठेवली जाईल.
जड वाहनांसाठी पर्यायी मार्गः
छत्रपती संभाजीनगर ते कन्नड मार्गः ही वाहने शरणापूर टी पॉइंट, माळीवाडा, कसाबखेडा फाटा, वेरूळमार्गे वळवण्यात आली आहेत. कन्नड ते छत्रपती
संभाजीनगर मार्गः ही वाहने वेरूळ, कसाबखेडा फाटा, माळीवाडा, शरणापूरमार्गे धावतील.
वेरूळ ते फुलंब्री मार्ग :
ही वाहने वेरूळ, कसाबखेडा फाटा, शरणापूर, छत्रपती संभाजीनगरमार्गे पुढे जातील. फुलंब्री ते वेरूळ मार्गः ही वाहने फुलंब्री, छत्रपती संभाजीनगर, शरणापूर, कसाबखेडा फाटामार्गे वळवण्यात आली आहेत. उरुस काळात शहरात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी व भाविकांच्या सुरक्षेसाठी वाहनचालकांनी निश्चित केलेल्या पर्यायी मार्गाचा वापर करावा आणि पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.













